हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकाही झाली. टीकेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ज्या शब्दावरुन वाद निर्माण करण्यात आला, असे आपण काही बोललोच नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले असून त्रिवेदी महाराष्ट्रात येऊन दाखव, आता माफी मागण्याच्या लायकीचंही ठेवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आ. रोहित पवार यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी याच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन, महाराष्ट्रात रोष शांत होत नाही. सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत, त्रिवेदींनी शिवरायांचाही उल्लेख केला. त्याकाळात माफीसाठी ठरलेल्या फॉरमॅटमध्ये पत्र लिहिले जात होते. आणि शिवरायांनीही औरंगजेबला 5 वेळा पत्र लिहिली, असे त्रिवेदी म्हणाले. तीन दिवसानंतर त्रिवेदीनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपचा एक प्रवक्ता दिल्लीमध्ये बसतो. अरे दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराजांनी हलवले होते. मात्र तिथे बसून तो म्हणतो की, महाराजांनी देखील माफी मागितली होती. अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागण्याच्या लायीकाचा देखील आम्ही सोडणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.
सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले,
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना? असे सुधांशू त्रिवेदी म्हणाले होते.