हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ओबीसी असल्याचा दाखला व्हायरल झाला होता. या दाखल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर हा दाखला खोटा असल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यानंतर आज याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच, शरद पवारांचा हा बनावट दाखला भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्याचा आरोप रोहित पवारांनी लावला आहे.
शरद पवारांच्या व्हायरल दाखल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “भाजपची ती प्रथा आहे, भाजपला सत्य कधी समजत नाही. त्यांना खोट्या गोष्टी कळत असतात. भाजपचे जे पैसे घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत, टोल आर्मी आपण त्याला म्हणतो प्रत्येक कमेंटला तीन रुपये आणि प्रत्येक लाईकला दहा पैसे अशावर काम करणाऱ्या लोकांनी हा दाखला बदलून व्हायरल केला”
तसेच, “भाजप हे सत्तेसाठी लढतंय, आम्ही सत्यासाठी लढतोय. सत्य आम्हाला माहित आहे. असत्याची बाजू घेऊन भाजपला सत्तेत यायच आहे. त्यामुळे लोकांच नुकसान झालं तरी त्यांना फरक पडत नाही. जसे भाजपचे नेते विचार करतात तसे कार्यकर्तेही विचार करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तो दाखला बदलून व्हायरल केल्याचे यात दिसत आहे” असा गंभीर आरोप यावेळी रोहित पवारांनी लावला आहे.
दरम्यान, राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीने जोर धरला असतानाच रविवारी शरद पवार यांचा सोशल मीडियावर ओबीसी’ उल्लेख असलेला दाखला व्हायरल झाला. मात्र हा दाखला बनावट आणि खोटा असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तसेच, सध्या व्हायरल होत असलेला दाखला इंग्रजीत आहे. खोडसाळपणा करण्यासाठी असा प्रकार घडवून आणला असल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यानंतर आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा दाखला व्हायरल केल्याचा आरोप रोहित पवारांनी लावला आहे. त्यावर, “आम्ही कशाला खोटी प्रमाणपत्रे व्हायरल करू, ती राष्ट्रवादीची परंपरा आहे” अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.