अहमदनगर प्रतिनिधी | कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांचे शुक्रवारी जामखेड येथे जंगी संवागत झाले. यावेळी पवार यांच्या कार्यकर्त्यांनी JCB ने गुलाल उधळून मोठी मिरवणुक काढली. मात्र शरद पवार नाशिक येथे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या भेटी घेत असताना रोहित पवार जेसीबीने गुलाल उधळत मिरवणुक काढत असल्याने नेटकर्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. आता पवार यांनी यावर आपली भुमिका मांडत नेटकर्यांना प्रत्युत्तर दिलंय.
मुंबईचे पक्षाचे समारंभ आटोपून मी विजयी झाल्यानंतर पहिल्यांदा जामखेडमध्ये पोहचलो. विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच पोहचल्यानंतर समजलं की लोकांनी मोठ्या उत्साहात माझी मिरवणूक काढण्याची तयारी केली आहे. ही लोकं म्हणजे नेमके कोण तर माझा विजय व्हावा म्हणून गेली सहा सात महिने रात्रीचा दिवस करणारी माझी हक्काची माणसं. अगदी दहा दहा रुपये गोळा करुन त्यांनी गुलाल आणला होता. यात जशी सामान्य माणसं होती तसेच JCB असोशिएशन लोक देखील होते. त्यांनी आमच्या पद्धतीने तुमचा सत्कार करु असा आग्रह धरला. तो आग्रह मी मोडणार नव्हतोच कारण त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या असं रोहित यांनी म्हटलं आहे.
आपल्या आनंदामुळे अगदी एका व्यक्तीला जरी वाईट वाटलं तर आपण त्या एका व्यक्तीचा विचार करायला हवा हेच मी लहानपणापासून शिकलो. कालचा दिवस हा माझ्यासाठी व कर्जत जामखेडच्या सर्वसामान्य मतदारांसाठी विशेष होता. कर्जत जामखेड हे माझं घर आहे अस मी मानत आलेलो आहे. विजयी झाल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यात आले. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिवाळीसाठी वेळ देत असताना परतीच्या मान्सूनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबद्दल माहिती गोळा करण्यात आली असेही पवार यांनी सांगितले.
मला नियोजित शेतकऱ्यांना भेटायला जायचं आहे अस सांगितलं तर समोरून उत्तर आलं, तूम्ही आत्ताही शेतकऱ्यांना भेटूनच आला आहात, मिरवणूक झाल्यानंतर देखील तुम्ही शेतकऱ्यांनाच भेटायला जाणार आहात फक्त आम्हाला तुमचे आत्ताचे चार तास द्या. आम्हाला गेली २५ वर्ष गुलाल लावता आला नाही. आत्ता नाही म्हणू नका. सर्वांनी मिळून मोठ्या आनंदात मिरवणूक काढली. त्यांच्या आनंदात मी सहभागी झालो. पण यामध्ये कुठेही शेतकऱ्यांच्या भावना दूखावण्याचा हेतू नव्हता. मी बांधिलकी जपतो ती या मातीशी अन् लोकांशी. आपल्या आनंदामुळे एकाही व्यक्तीचा अपमान व्हावा, त्यांना वाईट वाटावं असा माझा कधीच हेतू नव्हता व भविष्यात देखील नसेल असे पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान ज्या स्वच्छ मनाने मी यापुर्वी काम करत होतो त्याच स्वच्छ मनाने आणि अधिक वेगाने सामाजिक काम यापुढे करत राहिलं. सर्वसामान्य लोक, कार्यकर्ते व हितचिंतक हेच माझं बळ आहे. कोणाला उत्तर देण्यासाठी नाही तर एकाही व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून अगदी स्वच्छ मनाने आपणासमोर या गोष्टी मांडतोय असं पवार म्हणालेत.