रोहित पवार आता क्रिकेटच्या मैदानात; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

rohit pawar MCA
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी निवड झाली आहे. रोहित पवार यांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकल्याचे दिसत आहे. कारण शरद पवारांनी सुद्धा अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. तसेच आयसीसी आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सुद्धा ते राहिले होते.

आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन कमिटीची बैठक पार पडली. यावेळी रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. रोहित पवार यांसोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय सचिवपदी शुभेंद्र भंडारकर, सहसचिवपदी संतोष बोबडे आणि खजिनदारपदी संजय बजाज यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शरद पवार आणि क्रिकेट यांचं नातं संपूर्ण देशाला माहित आहे. शरद पवारांनी अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन, तसेच आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले आहे. क्रिकेटमध्ये शरद पवारांनी अनेक मोठे निर्णय घेतले होते. आता रोहित पवार सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकटच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांची कारकीर्द कशी होते हे आता पाहावं लागेल.

दरम्यान, खेळासाठी मी माझ्यापरीने काम करतच आहे पण माझ्या आवडीच्या क्रिकेट या खेळासाठीही काम करण्याची खूप दिवसांची इच्छा होती. आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे #MCA च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून तशी संधी मिळाली.आदरणीय पवार साहेबांनी सर्वच खेळासाठी सह्याद्रीइतकं मोठं काम केलं. ती उंची गाठणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शक्य नसलं तरी आदरणीय पवार साहेबांच्या रूपातील सह्याद्रीच्या शिखराकडं दीपस्तंभाप्रमाणे पाहूनच आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी खेळासाठी प्रामाणिकपणे काम करत राहील! अस ट्विट रोहित पवारांनी केलं.