वळसे-पाटील साहेब, तुम्हांला निष्ठा गहाण का ठेवावी लागली? रोहित पवारांचा थेट निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह सवता सुभा मांडला आणि भाजप शिंदे सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून यामध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश होता. पवारांच्या समंतीशिवाय वळसे पाटील असा निर्णय घेऊच शकत नाहीत असेही तर्क वितर्क लावले जात होते. मात्र ज्यांना इतक्या वर्षी स्वीय्य सहाय्यकाची जबाबदारी दिली, मंत्री केलं त्याच वळसे पाटलांनी शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट हल्लाबोल केला आहे. वळसे-पाटील साहेब, अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली असा थेट सवाल रोहित पवारांनी केलाय.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत म्हंटल कि, मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती.

असो! प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? असा सवाल रोहित पवारांनी केलाय. यावेळी त्यांनी #तुम्हालाकायकेलंहोतंकमी? #कापत्करलीगुलामी? असे हॅशटॅग सुद्धा वापरले आहेत. याशिवाय शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना राजकीय नेता म्हणून आत्तापर्यंत काय काय दिले याचा लेखाजोखाही रोहित पवारांनी यावेळी मांडला.