पंढरपूर, नांदेड पोटनिवडणूकीवेळी राज ठाकरेंनी पत्र का काढलं नाही? पवारांचा थेट सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात अशा आशयाचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर केलं होत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत पंढरपूर, कोल्हापूर आणि नांदेड पोटनिवडणूकीवेळी राज ठाकरेंनी अशा प्रकारचं पत्र का काढलं नाही असा थेट सवाल केला आहे. तसेच भाजपच्या नादाला जे जे लागले ते ते राजकीय दृष्ट्या संपले असा इशाराही त्याची राज ठाकरेंना दिला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, चिंचवड, कसबा पेठ निवडणूक बिनविरोध व्हावी असे पत्र राज ठाकरेंनी काढलं. अंधेरीतील महाविकास आघाडीच्या आमदारांचे निधन झालं तेव्हा सुद्धा त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना पत्र लिहलं होतं. पण, पंढरपूर, नांदेड आणि कोल्हापूरच्या निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी पत्र काढलं नाही. हा भेदभाव का करण्यात आला, हे राज ठाकरेच सांगू शकतात असा टोला रोहित पवारांनी लगावला.

मी सुद्धा राज ठाकरेंच्या भाषणाचा आणि पूर्वीच्या स्टाईलचा चाहता आहे. पण पूर्वीची त्यांची पद्धत ज्यावर आपण सर्वजण फिदा होतो ती आता कुठेतरी बदलत चालली आहे. भाजपाचा प्रभाव राज ठाकरेंवर पडत असल्याचं दिसत आहे. ही गोष्ट अनेक जणांना भावत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:ची स्टाईल जपली पाहिजे. भाजपाच्या नादाला लागलेले पक्ष असो किंवा व्यक्ती दोन्हीही राजकीय दृष्ट्या संपलेले आहेत असा इशाराही रोहित पवारांनी राज ठाकरेंना दिला आहे.