बिबट्या शोधण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार ; हातात काठी घेऊन केली शोधमोहीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण येथे सहा दिवसात एकापाठोपाठ एक तीन जणावर हल्ला करून त्यांचे बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात विशेषत: नरभक्षक ज्या भागात चिखलठाण, वांगी, बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हातात काठी घेऊन वन अधिकाऱ्यांसोबत काही काळ शोध मोहीमेत भाग घेतला. रात्रीही बिबट्या हाती लागला नसला तरी पवारांनी संवाद साधत ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

आमदार रोहित पवार कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा शेजारच्या तालुक्यातील हल्ल्याची एक घटना ताजी असल्याने पवार यांनी तेथे धाव घेतली. कर्जत तालुक्यातील ग्रामस्थांसोबतच करमाळा तालुक्यातील ग्रामस्थांशीही संवाद साधत त्यांना धीर दिला. रात्रीच्या गस्तीवरील वन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधून मोहिमेची माहिती घेतली.

या कामात त्यांना प्रोत्साहन देण्याचा एक भाग म्हणून आमदार पवार यांनी स्वत: हातात काठी घेतली आणि वन विभागाच्या पथकात काही काळ गस्तीत सहभाग नोंदविला. करमाळा तालुक्यातील वांगी, सांगवी येथे जाऊन त्यांनी ग्रामस्थांशीही संवाद साधला. काहीही करून बिबट्याला तातडीने पकडावे किंवा मारावे व आमची या संकटात सुटका करावी, अशी मागणी दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’