हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार राज्यातील तरुणांच्या प्रश्नांना घेऊन काम करताना दिसत आहेत. आता याच प्रश्नांना घेऊन रोहित पवार राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. 24 ऑक्टोंबरपासून म्हणजेच दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेला पुण्यातून निघून देहू, आळंदी संत पिठाला नतमस्तक करून सुरुवात करण्यात येईल. युवा संघर्ष पदयात्रेमध्ये रोहित पवार दिवसाला 23 किलोमीटर चालतील. युवा संघर्ष यात्रेचे अंतर 820 किलोमीटर इतके असणार आहे. शेवटी ही यात्रा नागपूर येथे संपवण्यात येईल.
राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा करणारे युवक, डिग्री असूनही काम नसलेले विद्यार्थी तसेच आर्थिक अडचणीत सापडलेले विद्यार्थी या सर्व प्रश्नांना घेऊन रोहित पवार युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. मुख्य म्हणजे, या यात्रेमध्ये फक्त युवा तरुणच असणार आहेत. तसेच यात्रेमध्ये फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरला जाणार आहे. या यात्रेमध्ये जे जे प्रश्न रोहित पवारांच्या समोर मांडले जातील त्या सर्व प्रश्नांना रोहित पवार येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार आहेत. त्यामुळेच ही यात्रा फक्त राज्यातील तरुणांच्या प्रश्नांना घेऊन काढण्यात आली आहे.
या यात्रेविषयी माहिती देताना रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “गेल्या अनेक दिवसांपासून आमचे मन अस्वस्थ झाले होते. या काळात आम्ही शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत होतो. सध्याचे सरकार फक्त युवकांच्या तोंडचे पाने पुसण्याचे काम करत आहे. अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं, असं स्वत:ला विचारलं, त्यानंतर साहेबांचा सल्ला घेतला. त्यानंतर आम्ही युवा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. यंदाची दिवाळी ही आम्ही यात्रेतच साजरी करणार आहोत. या यात्रेचा समारोप नागपूर येथे होईल.
त्याचबरोबरच, “या यात्रेदरम्यान कोणतीही गाडी, सायकल वापरणार नसून पायी चालत दिवसाला 17 किलोमीटर तसेच जास्तीत जास्त 23 किमी चालणार आहोत. दसऱ्याच्या दिवशी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढण्यात येईल. लाल महाल, देहू आळंदी संत पिठाला नतमस्तक होत यात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा एकूण ८२० किलोमीटरची असणार आहे. १३ जिल्ह्यामध्ये ही यात्रा प्रवास करेल. या युवा संघर्ष यात्रेत फक्त शरद पवारांचा फोटो असेल. यात्रेत कोणताही लोगो नसणार असून यात्रेत कुणालाही सहभाग घेता येणार आहे.” अशी माहिती देखील रोहित पवारांनी दिली आहे.