रोहित शर्मा आऊट झाल्याने CSK च्या चाहत्याने चिडवलं; मग MI फॅन्सने थेट डोक्यातच काठी घातली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL ची चर्चा आहे. क्रिकेट हा खेळ भारतात एखाद्या धर्माप्रमाणे आहे, त्यामुळे क्रिकेटपटुंवर प्रेम करणारे करोडो चाहते भारतात आहेत. आयपीएल सुरु असताना तर प्रत्येकजण वेगवेगळ्या संघाला सपोर्ट करत एकेमकांवर शाब्दिक चकमक करत असतात. मात्र खेळाच्या या नादात आपण काय करतोय याच भान कोणालाच नसत. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडला आहे. हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा आऊट (Rohit Sharma OUT) झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्याने जल्लोष केला अन मग रागाच्या भरात MI फॅन्सने थेट त्याच्या डोक्यातच काठी घालत जबर मारहाण केली. बंडोपंत बापूसो तिबिले (वय ६३, रा. हणमंतवाडी) असं जखमी झालेल्या चेन्नईच्या चाहत्यांचे नाव आहे. याप्रकरणी बळवंत महादेव झांजगे (वय ५०) आणि सागर सदाशिव झांजगे (वय ३५, दोघे रा. हणमंतवाडी) यांना करवीर पोलिसांनी अटक केले

याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवारी रात्री बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांसोबत गल्लीतील एका घरात सनरायजर्स हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना पाहत होते. हे दोघेही मुंबई इंडियन्सने चाहते आहेत. या सामन्यात हैद्राबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल २७७ धावांचा डोंगर रचला होता, त्यामुळे मुंबईचे चाहते आधीच संतापले होते. त्यानंतर मुंबईच्या फलंदाजीवेळी आक्रमक क्रिकेट खेळणारा रोहित शर्मा बाद झाला त्याचा वेळी चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले तिथे पोहोचले. ‘रोहित शर्मा गेला. आता मुंबई कशी जिंकणार?’ असे म्हणत ते चेन्नईचे गुणगान गाऊ लागले. याचा राग मनात धरत मुंबईचे चाहते असलेले बळवंत झांजगे यांनी तिबिले यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली, तर सागरने डोक्यात फळी घातली. या मारहाणीत बंडोपंत तिबिले बेशुद्ध पडले.

या घटनेनंतर, बंडोपंत तिबिले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत जखमी बळवंत तिबिले यांचे भाऊ संजय बापूसो तिबिले (वय ४८) यांनी करवीर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.