रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआय जिल्हाध्यक्षाची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर स्वतःच्याच पक्षातील जिल्हाध्यक्षानी सडकून टीका केली आहे. रामदास आठवले हे मंत्रिपदासाठी लाचार झाले आहेत. असा लाचार झालेला नेता आम्हाला नको, अशा शब्दांत रिपाईचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी आठवलेंवर टीका केली.

रामदास आठवले यांनी जातीयवादी भाजपशी युती केली तेव्हापासूनच आंबेडकरी जनता रामदास आठवले यांच्याविरोधात गेली आहे. पूर्वीचा पँथर वाघ असलेला रामदास आठवले आम्हाला नेता म्हणून हवा होता, मंत्रिपदासाठी लाचार झालेला रामदास आठवले आम्हाला नकोय. आम्ही भाजपचं मिशन कमळ कधी ही यशस्वी होऊ देणार नाही, असे रतन कदम यांनी म्हटले.

दरम्यान, स्वतःच्या पक्षातील जिल्हाध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर टीका करत असल्याने पक्षांतर्गत असलेल्या कुरबुरी चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता रामदास आठवले स्वपक्षातील नाराजी दूर करण्यासाठी काय पावले उचलणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे.