हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी फारशी काही चांगली नाही आहे. या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स संघ ५ पैकी २ सामने जिंकून गुणतालिकेत ६व्या नंबरवर आहे. यामुळे राजस्थान रॉयल्सला अजून आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व भारताचा युवा क्रिकेटपटू संजू सॅमसन करत आहे. राजस्थान रॉयल्स संघाला ह्या सीझनमध्ये काही महत्वाच्या खेळाडूंची कमतरता भासत आहे. त्यामध्ये बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, लाईम वेलिंगस्टोन या खेळाडूंचा समावेश आहे.
माजी फिरकीपटू प्रग्यान ओझा यांने राजस्थानकडून मैदानात सांघिक कामगिरी अभाव दिसत असल्याचे विधान केले होते. प्रग्यान ओझा याने केलेल्या विधानाला पाठिंबा दर्शवत भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने मोठे विधान केले आहे. “संजू सॅमसनला कर्णधार केल्यामुळे संघातील इतर खेळाडू कदाचित खूश झालेले दिसत नाहीत. पण एक खेळाडू जो आपल्यासोबतच असतो आणि अचानक त्याला संघाचा कर्णधार केले जाते अशावेळी सर्वांना त्याच्याशी जुळवून घेण्याला थोडा वेळ लागतो हे देखील तितकंच खरं आहे”, असे विधान वीरेंद्र सेहवाग यांनी केले आहे.
“जेव्हा एखादा गोलंदाज फलंदाजाकडून खूप मार खात असतो. तेव्हा कर्णधाराने कोणतेही आढेवेढे न घेता गोलंदाजाच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचं आहे. त्यामुळे गोलंदाज सकारात्मक विचार करु लागतो. त्यालाही वाटू लागतं संघाच्या कर्णधाराला आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे कर्णधारानं संवाद वाढवणे खुप गरजेचं आहे. जेव्हा राजस्थानच्या संघातील फलंदाज चांगली कामगिरी करत नाही किंवा परदेशी खेळाडू देखील एकमेकांसोबत जास्त बोलत नाहीत. त्यामुळेच राजस्थानचा संघ एक संघ दिसत नाही”, असे वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे.