सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अकोला येथे सध्या कार्यरत असलेले रूचेश जयवंशी हे सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. याबाबतचे पत्र मुंबई मंत्रालयातून जारी करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे जानेवारी 2020 मध्ये सातारा येथे रुजू झाले होते. कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेवरती विशेष लक्ष दिले होते. शेखर सिंह त्यांच्या कार्यशैलीमुळे सुरुवातीला वादग्रस्त ठरले होते. कोरोना काळात त्यांच्या कामावरती अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात स्वतः दौरे करून माहिती घेतली होती. त्यामुळे कोरोना हाताळण्यात शासकीय यंत्रणेला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळाले.
रुचेश जयवंशी हे अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात व्यवस्थापकीय संचालक या पदावरती कार्यरत आहेत. तसेच त्यांनी हिंगोली येथेही कार्यभार सांभाळला आहे. त्याचबरोबर अपंग विभागातील काही काळ काम पाहिले आहे.