पवारांना सैतान म्हणणाऱ्या सदाभाऊंना चाकणकरांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या ज्या माणसाला पक्ष स्थापन करून….

Rupali Chakankar On Sadabhau Khot
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. शरद पवारांचा उल्लेख सैतान असा करत त्यांना याच जन्मात पापे फेडावी लागतील असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटल्यानंतर नुकत्याच अजित पवार गटात गेलेल्या महिला नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सदाभाऊ, आपला आवाका आणि कुवत बघून बोला. ज्या माणसाला पक्ष स्थापन करून ४ कार्यकर्ते जमवता आले नाहीत त्यांनी देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या आदरणीय पवार साहेबांवर बोलायची गरज नाही असा पलटवार चाकणकर यांनी केला आहे.

याबाबत रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटल कि, आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल बोलताना अतिशय संतापजनक विधाने करणाऱ्या विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. सदाभाऊ खोत यांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल केलेलं वक्तव्य हे त्यांच्या बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपला आवाका आणि कुवत बघून त्यांनी बोलावं. राष्ट्रवादी काय आहे हे आपण सांगण्याची गरज नाही, ज्या माणसाला पक्ष स्थापन करून ४ कार्यकर्ते जमवता आले नाहीत त्यांनी देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या आदरणीय पवार साहेबांवर बोलायची गरज नाही.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवार हे सैतान असून त्यांना त्यांची पापे फेडावीच लागणार आहेत. शरद पवारांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केलं, त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली, गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर नियतीने मोठा सुड उगवला. त्यामुळे त्यांना गावगाड्याकडे धावतं यावं लागत आहेत. यापूर्वी पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू आली होती आता मात्र पुतण्यापासून मला वाचवा अशी नवी हाक महाराष्ट्राला ऐकू येत आहे. पूर्वीच्या काळी बापाने पाप केलं कि ते पोराला फेडावं लागत होत, पण या कलयुगात ज्याचे त्यालाच पाप फेडावं लागतंय अस म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला होता .