व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वेदांत वरून काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल; हजारो करोड पाण्यात घातल्याचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकान सेमिकंडक्टर प्रकल्प गुजरात ला गेल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत असा टोला त्यांनी लगावला.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हंटल की, वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातच्या ढोलेराला नेण्याने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत. आजवर ढोलेरामधून अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे. वेदांता कंपनीने तळेगाव व ढोलेरा या दोन्ही स्थळांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. कंपनीच्या अंतर्गत अहवालानुसार ढोलेरा येथे पाण्याची व कुशल कामगारांची कमतरता, इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टिम नसणे, दुय्यम उत्पादकांची कमतरता व दलदलयुक्त जमीन अशी अनेक कारणे देऊन नापसंती व्यक्त केली होती अशी माहिती सचिन सावंत यांनी सांगितली.

महाराष्ट्रातील तळेगाव हेच या प्रकल्पासाठी सुयोग्य जागा होती. या करिता महाराष्ट्राने गुजरातपेक्षा अधिक भांडवली अनुदानासहित अनेक सवलती देऊनही आयत्या वेळी सदर प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झाला आहे. १० बिलियन डॉलर गुंतवणूकीच्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी देशात वेदांता फॉक्सकॉन सहित तीन कंपन्यांनी अर्ज केला. त्यातील ISMC Digital ही कंपनी ढोलेराला येणार होती‌.या कंपनीबरोबर गुजरात सरकारचा सामंजस्य करारही झाला होता. आता कंपनीने सुविधा व पाण्याच्या कमतरतेमुळे पळ काढला आहे.

जिओफोन ही ढोलेरा सोडून तिरुपतीला गेला. या अगोदर लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या कंपनीने सोलार बॅटरी प्रकल्पातून ढोलेरामधून माघार घेतली. HCC ही सोडून गेली आहे. केंद्र सरकारच्या अट्टाहासाने वेदांन्ता फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची किंवा प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले. ढोलेरा हा त्यातीलच एक प्रकल्प आहे. असाच गिफ्ट सिटी प्रकल्प रखडला होता. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तिथे नेले.

गॅसचे साठे मिळाले असे दाखवून GSPCला ₹१०००० कोटीचे रोखे घेण्यास भाग पाडले गेले. पुढे साठा काय तर गॅसच नाही हे स्पष्ट झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या या कंपनीला केंद्रात सत्ता आल्यानंतर ओएनजीसीला विकत घेण्यास भाग पाडले गेले अस ट्विट सचिन सावंत यांनी केलं.