हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं. सचिन वाझे (Sachin Vaze) याची चौकशी करताना NIA ने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
मंगळवारी NIA ने कोर्टात म्हटलं की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते. कट रचणाऱ्यांसोबत सचिन वाझे मोबाईलवरून संपर्कात होते. हे षडयंत्र कोणी रचलं आणि हत्येमागे काय हेतू होता? इथपर्यंत NIA चा तपास पोहचला आहे, असे त्यांनी सांगितले आहे. NIA कोर्टाने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. याच दरम्यान पुन्हा एक महत्वाची माहिती एनाआयएच्या हाती लागली आहे.
स्फोटकं असलेली कार वाझे यांनी नाही, तर त्यांच्या खासगी ड्रायव्हरने पार्क केली होती, असे एनआयएच्या तपासातून समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २५ फेब्रवारी रोजी अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ पार्क करण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझे यांनी नाही, तर त्यांचा खासगी चालकाने पार्क केली होती. तर सचिन वाझे पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवत होते, अशी माहिती आता एनआयए तपासातून समोर आली आहे.
सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून त्यांचा खासगी ड्रायव्हर स्कॉर्पिओ उभी करण्यात आलेल्या मुलूंड-ऐरोली रस्त्यावर गेला. वाझेंच्या ड्रायव्हरने कार सोसायटीत आणली. त्यानंतर २४ फेब्रवारीपर्यंत कार तिथेच उभी होती. २५ फेब्रवारी रोजी ड्रायव्हर ती कार घेऊन दक्षिण मुंबईत गेला आणि अंबानींच्या घराजवळ कार पार्क केली. १७ मार्च रोजी मनसुख हिरेन यांनी मुलूंड-ऐरोली रोडवर स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती. त्यानंतर त्याच दिवशी मनसुख हिरेन हे शहर पोलीस मुख्यालयात आले आणि त्यांनी ऑफिसमध्ये सचिन वाझे यांच्याकडे कारची चावी दिली, असं एनआयएने नमूद केले आहे.
ड्रायव्हर ज्यावेळी स्कॉर्पिओ घेऊन अँटिलियाच्या दिशेनं येत होता, पोलिसांनी गाडी अडवू नये म्हणून वाझे स्कॉर्पिओच्या मागेच होते. रात्री दहा वाजता ड्रायव्हरने अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली कार पार्क केली. त्यानंतर उतरून तो वाझे चालवत असलेल्या इनोव्हा गाडीत जाऊन बसला, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या हाती लागली आहे. एनआयएच्या माहितीप्रमाणे, तपास पथकाला १४ मोबाईल क्रमांक सापडले त्यातील ५ मोबाईल नंबर सचिन वाझेंना देण्यात आले होते. यातील एका मोबाईल नंबरवरून सचिन वाझे मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी वापरत होता. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा उलगडा होण्यापर्यंत NIA चा तपास पोहचला आहे. सचिन वाझेला ३ एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.