हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजप नेत्यांबरोबर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाही. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही, असे खोत यांनी म्हंटले आहे.
सांगलीत वीज बिल वसुलीच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवादही साधला. यावेळी ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही आता महालातून बाहेर या आणि महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न जाणून घ्या. अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाही. प्रत्येकवेळी वाघ बिळात जाऊन बसतोय, बिळातून बाहेर या आणि खरा वाघ दाखवा. आपण केलेला भ्रष्टाचार अधिवेशनात बाहेर येईल आणि अनेकांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागेल, ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना भीती वाटत आहे. या भीतीपोटी हे सरकार सातत्याने कोरोनाच्या भूताच्या मागे लपून बसत आहे. हे सरकार म्हणजेच कोरोनाचे भूत झाले, आहे असे म्हणावे लागेल.
गेल्या 2 वर्षात सरकार अधिवेशनातून सारखे पळ काढत आहे. यंदाचे अधिवेधन देखील ओमिक्रॉनच्या पाठीवर बसून आले आहे. राज्य सरकार पाच दिवसाचे अधिवेशन घेत आहेत. देशाचे अधिवेशन महिनाभर सुरू राहते आणि महाराष्ट्रचे अधिवेशन फक्त 5 दिवस का? असा सवाल यावेळी खोत यांनी यावेळी उपस्थित केला.