सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
राजू शेट्टींच्या विजयाचा गुलाल आम्ही अंगावर घेतला. त्यांच्या पराभवाचा गुलालही आम्ही उधळला हे वैशिष्टये आहे. आयुष्यात फार कमी लोकांना ही संधी मिळते. हा विजय शेतकर्यांचा आहे. असे प्रतिपादन ना.सदाभाऊ खोत यांनी केले. मी देवाच्या आळंदीला जातो असे म्हणून जनतेची फसवणूक करत चोरांच्या आळंदीला तुम्ही गेलात. आता माफी मागण्याचे धारिष्टय दाखवा असे आवाहन त्यांनी केले.
सदाभाऊ खोत म्हणाले, राजू शेट्टींनी चळवळ आत्मकेंद्रीत केली. त्यांना मीची बाधा झाली होती. कार्यकर्त्यांना कमी लेखून जीवनातून उठवले. लोकांसमोर भावनिक बोलून स्वतःची खुर्ची सांभाळण्याच्या कामात ते माहिर होते. आयुष्यात पुढे जायचे असेल तर मुंगी होवून साखर खाल्ली पाहिजे. गत लोकसभा निवडणूकीत खा.राजू शेट्टी यांनी भाजप, शिवसेना महायुतीला पाठींबा दिला होता. परंतू काही दिवसांनी महायुतीला पाठींबा दिल्याची चूक झाली असे बोलत त्यांनी आत्मक्लेश यात्रा काढली. आता जनतेला आत्मक्लेश झाल्याने जनतेनेच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. सर्वसामान्य जनतेने तुम्हाला घरी बसवले आहे. आता आत्मक्लेशाची यात्रा कधी काढणार आहात. पंचगंगेच्या डोहात अंघोळ करून पायी काशीला चालत जावा. गंगेत पापमुक्त व्हावे. विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करू शकलो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.