वाढलेल्या मृत्यूदराचे क्रेडिट जयंतरावांचेच; सदाभाऊ खोतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगलीत करोना रुग्णांचा वाढता मृत्यूदर आरोग्य यंत्रणा आणि पालकमंत्र्यांचे अपयश स्पष्ट करणारा आहे. कठीण काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गतिमान करण्याऐवजी पालकमंत्री जयंत पाटील मुंबईत जाऊन बसले आहेत. पूरबाधित गावांना बोटी देण्याचे श्रेय घेण्यासाठी धडपडणा-या पालकमंत्र्यांनी आता जिल्ह्यातील वाढत्या मृत्यूदराचेही क्रेडिट घ्यावे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत. दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील मृत्यूदराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परिस्थितीबद्दल गांभीर्य व्यक्त केले आहे.

गेल्या महिन्यापासून सांगलीत करोना संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. रोज सरासरी चारशे ते पाचशे रुग्णांची भर पडत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ११ हजार ३९६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत ४६५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेशा आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्याने रुग्णांची फरफट सुरू आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने गंभीर रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभर वणवण करूनही रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. सध्या सांगलीचा मृत्यूदर सर्वाधिक असूनही सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी परिस्थिती गांभीर्याने घेतली नसल्याची टीका नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यानंतर सोशल मीडियातूनही पालकमंत्र्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. सांगलीतील वाढलेल्या मृत्यूदराचे क्रेडिट पालकमंत्र्यांचेच असल्याचे मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

आमदार सदाभाऊ खोत यांनाही करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सांगलीतील वाढलेल्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्र्यांच्या दौ-यानंतरही सांगलीतील परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला आहे. निष्क्रिय आणि बोलघेवड्या अधिका-यांना पदावरून दूर करून चांगले सक्षम अधिकारी द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पालकमंत्री जयंत पाटील गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात नाहीत. याच कालावधीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगली दौरा करून वाढलेल्या मृत्यू दराबाबत प्रश्न उपस्थित केले. यानंतर पालकमंत्र्यांनी मुबईतूनच रविवारी ऑनलाइन बैठक घेऊन अधिका-यांशी चर्चा केली. मात्र, कठीण काळात पालकमंत्र्यांनी जिल्ह्याबाहेर थांबून केवळ सूचना देण्यापेक्षा स्वतः जिल्ह्यात थांबून यंत्रणा गतिमान कराव्यात, अशी अपेक्षा सांगली शहर सुधार समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment