हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. शरद पवार यांनी आयुष्यभर काड्या करायचं काम केलं. त्यामुळे त्यांनी आपलं आडनाव आगलावे करावं अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. सदाभाऊंच्या या टिकेनंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
शरद पवार महान नेते आहेत. जाईल तिथे आग लावायची आणि दुसऱ्या घराला आग लावायला जायचं. त्यांचं आयुष्य हे आग लावण्यातच, आणि काड्या करण्यात गेलं त्यामुळे त्यांनी आपलं आडनाव पवारांऐवजी आगलावे असे करावं जेणेकरून जेवढं हे राज्य आत्तापर्यंत होरपळून निघालं आहे ते थांबलं पाहिजे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे . सदाभाऊ फार छोटे आहेत. शरद पवारांचे राजकारण , त्यांचा अनुभव आणि लोकांसाठी त्यांनी केलेले समाजकारण समजून न घेता फक्त पवार साहेबांवर बोललं म्हणजे आपण मोठं होऊन जातो असा हा समज आहे. सूर्यावरती थुकण्यासारखा हा प्रकार आहे असे प्रत्युत्तर विद्या चव्हाण यांनी दिले.