घरी जेवायला बोलवून साडूने केला साडूचा खुन; मृतदेह फेकला मक्याच्या शेतात

औरंगाबाद – जेवणासाठी घरी बोलावून साडूनेच साडूचा घात केल्याची घटना कन्नड तालुक्यातील कुंजखेडा येथे घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. एजाज खाँ हारुण खाँ पठाण असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेफुज खाँ महेबुब खाँ पठाण (23) व मयत एजाज खाँ हारुण खाँ पठाण (35) हे दोघे एकमेकाचे साडू आहेत. रविवारी रात्री महेफुजने एजाज खाँ यास घरी जेवणासाठी निमंत्रण दिले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महेफुजने अज्ञात कारणावरून एजाजच्या डोक्यात लोखंडी दांड्याचा प्रहार करून ठार मारले. त्यानंतर मृतदेह दीडशे फुट फरफटत नेऊन मक्याच्या शेतात टाकला. सकाळ झाल्यानंतरही मुलगा एजाज घरी परतला नसल्याने वडील हारुण खाँ उस्मान खाँ पठाण महेफुजच्या घराकडे गेले. येथे त्यांना एजाजची गाडी दिसली. मात्र, त्याचा फोन लागत नसल्याने घराजवळ शोध घेतला. यावेळी मकाच्या शेतात एजाजचा मृतदेह आढळून आला. हारून यांनी याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्यात आली. माहिती मिळताच सपोनि टी. आर. भालेराव, पोहेकॉ सतिष खोसरे, कैलास करवंदे, संजय आटोळे, अजय मोतिंगे, पोना बाबासाहेब धनुरे, सुरेश शिंदे, अंमलदार विजय चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, पोलिसांनी महेफुजला कन्नडवरून घराकडे परतत असताना ताब्यात घेतले. शेतात मृतदेह टाकून आरोपी काहीच झाले नाहीं असा दिखावा करत कन्नडला दुध विक्रीसाठी गेला होता. पोलीसांच्या चौकशीत आरोपी महेफुजने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मयताचे वडील हारुण खाँ यांच्या फिर्यादीवरून मेह्फुज पठाण, मेहमूद पठाण आणि नशीब पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.