औरंगाबाद – शहरातील नामवंत एमआयटी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली. विद्यार्थ्याचा गळा चिरून चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला होता. कृष्णा शेषराव जाधव (22, रा. हडको) असे मृताचे नाव आहे. यामुळे शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत असून, यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कृष्णाच्या वडिलांचे टीव्ही सेंटर भागात बालाजी ऑप्टिकल नावाचे दुकान आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दहा ते पंधरा मिनिटांसाठी जातो, असे सांगत कृष्णा बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दुकानातून बाहेर पडला. त्यापूर्वी दुपारी कृष्णाचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे तो बहिणीचा आयफोन घेऊन घराबाहेर पडला. एमजीएम रुग्णालयाजवळील एका हॉटेलजवळ गेलेला कृष्णा तिथून थेट हिमायतबागेत आला. यावेळी त्याचा एक मित्र देखील सोबत होता. रात्री उशिरापर्यंत कृष्णा घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी त्याच्याजवळील आयफोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन कोणीही उचलत नव्हते. काही वेळाने कृष्णाचा फोन स्वीच ऑफ झाला. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्न केल्यानंतर जाधव कुटुंबियांनी सिडको पोलिस ठाणे गाठले. कृष्णा बेपत्ता झाल्याची त्यांची सिडको पोलिसात मध्यरात्री अडीचच्या सुमारास देण्यात आली. रात्रभर जाधव कुटुंबिय कृष्णाचा शोध घेत होते.
काल सकाळी साडेदहाला कृष्णाचा मृतदेह मिळाल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. कृष्णाचा मृतदेह नेईपर्यंत कुटुंबिय घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्यासमोर पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेने घाटीत नेला. या खूनाच्या घटनेमुळे पोलिस दल पुरते हादरुन गेले आहे. बेगमपुरा, गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. मात्र, घटनेचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.