अहमदनगर प्रतिनिधी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी युतीने श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले यांना मैदानात उतरले आहे. नवलेंना सेनेकडून बुधवारी सायंकाळी संगमनेर विधानसभा जागेसाठी एबी फॉर्म दिला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून युतीकडून सक्षम उमेदवारासाठी चाचपणी सुरू होती. अनेक नावांवर चर्चा झाली होती. अखेरीस साहेबराव नवले आणि विक्रमसिंग खताळ अशी दोन नावे चर्चेत होती. बुधवारी सेनेने नवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. नवले यांनी यापूर्वी जनता दलातर्फे निवडणूक लढवत संगमनेर मतदारसंघातून थोरातांना आव्हान दिल होत. आता ते पुन्हा एकदा युतीकडून रिंगणात उतरल्याने थोरातांसमोर आव्हान निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
थोरातांचे कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून नवले यांची ओळख आहे. श्रमिक उद्योग समुहाच्या माध्यमातून कृषी, दुग्ध शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत आहेत. प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याविरोधातील लढत यावेळी युतीने चांगलीच प्रतिष्ठेची केलीये. त्यामुळे या मतदारसंघातील सामना कसा होणार, याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.