कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खटाव तालुक्यातील विखळे येथील वीज उपकेंद्रातील ट्रांसफार्मला अचानक आग लागली असल्याचा फोन राज्याचे सहकार व पणन मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना आला होता. त्यांनी तात्काळ सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडील अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी पाठवून दिली. सुमारे पाऊण तासाच्या आत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली व आग आटोक्यात आणण्यात आली.
त्या ट्रान्सफॉर्मरच्या जवळ दुसरा ट्रान्सफॉर्मर होता, आग आटोक्यात आली नसती, तर त्या दुसऱ्याही ट्रांसफार्मने पेट घेतला असता. मात्र अग्निशामन दलाच्या गाडीने आग विझवून, आगीवर वेळेत नियंत्रण मिळवल्याने दुसरा ट्रांसफार्मर वाचला. यामुळे लाखोंचे नुकसान टळले. त्यामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यतत्परतेचे दर्शन पुन्हा एकदा दिसून आले.
विखळे येथील वीज उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मरला अचानक आग लागली . त्यामध्ये ट्रान्स्फॉर्मर जळून खाक झाला. त्यामुळे परिसरातील विखळे, कलेढोण, गारळेवाडी, गारुडी, तरसवाडी, मुळोकवाडी, पाचवड, औतडवाडी, ढोकळवाडी, पडळ, हिवरवाडी व कान्हरवाडी अशा १२ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. सदरची आग विझवण्यासाठी सह्याद्रि सहकारी साखर कारखाना, विटा नगरपालिका सहकार्य मिळाले व अधिकचे नुकसान टळले.
आगीची माहिती मिळताच महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे , अतिरिक्त कार्यकारी अभियंता हनुमंत ढोक , उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी मायणीचे शाखा अभियंता विशाल नाटकर, सह्याद्रि कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी आर. जी. तांबे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.