हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडी ने जप्त केला आहे. अजित पवार यांच्या नातेवाईकांचा हा कारखाना असल्याने अजित पवारांसाठी हा मोठा धक्का होता. दरम्यान ईडीच्या या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
एखाद्या एजन्सीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त चौकशी पारदर्शक झाली पाहिजे, यामागचं गौडबंगाल काय आहे जनतेला माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला तसेच यापूर्वी देखील सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजितदादा म्हणाले.
हा कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ कंपन्यांनी टेंडर भरलं होतं. पण यामधील सर्वात जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने भरलं होतं. त्यांनी ६५ कोटी ७५ लाखांची बोली लावली आणि तो विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.