हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मीठ (Salt)हा आपला रोजच्या जीवनातील गरजेचा घटक आहे. कोणताही पदार्थ बनवायचा म्हंटल की, त्यामध्ये मीठ टाकावंच लागत. जेवणात मीठ नसेल तर त्या जेवणाला कसलीही चव येत नाही. त्यामुळे मिठाला मोठं महत्त्व आहे. परंतु जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचा जीव जाऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? होय हे खरं आहे. जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) ने याबाबत इशारा दिला आहे. जास्त मिठाच्या सेवनाने 2030 पर्यंत संपूर्ण जगात 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होईल असं WHO ने म्हंटल आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला सतत वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागू शकत. जगात सर्वाधिक मृत्यू हे जास्त मीठ खाल्ल्याने होतात. जर लोकांनी जास्त मीठ खाण्याच्या सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही आणि हे जर असच सुरु राहिले तर 2030 पर्यंत 70 लाख लोकांना त्यांचा जीव गमावला लागेल. यामुळेच 2030 पर्यंत लोकांच्या जेवणातील 30 टक्के मीठ कमी करण्याचे लक्ष्य WHO ने ठेवले आहे. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज फक्त 0.5 ग्रॅम मीठ खावे असे WHO ने म्हंटल आहे.
जास्त मिठाचे सेवनाने शरीरात पाण्याची साठवण वाढते. तसेच उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्येही वाढ होते. याशिवाय जास्त मीठ खाल्ल्याने किडनीशी संबंधित आजार, पक्षाघात आणि अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. सध्या जागतिक पातळीवर बोलायचं झाल्यास, सर्वाधिक मीठ खाणाऱ्या देशांच्या यादीत चीन अव्वल स्थानावर आहे, चीनमधील लोक दररोज 10.9 ग्रॅम मीठ खातात. भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे आणि भारतातील सामान्य लोक दिवसातून 10 ग्रॅम मीठ खातात.