हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ठाकरे सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सरकारला विविध सूचना देत होते. त्यावरून राज्यपाल आणि सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवरून खटके उडताना आपण पहिले. आता राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे मात्र राज्यपालांनी अजून तरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यावरून सामनातील रोखठोक सदरातून कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या कुठे भूमिगत झाले आहेत याबाबत कोणी खुलासा करेल काय? मुळात आपले राज्यपाल राजभवनात आहेत की नाहीत, ते गृहमंत्री श्री. फडणवीस यांनी जनतेसमोर आणावे. ‘ठाकरे’ सरकारच्या काळात सध्याच्या राज्यपाल महोदयांची काम करून दमछाक होत होती. पूरस्थितीत स्वतंत्र दौरे काढून प्रशासनास वेगळया सूचना देत होते. इतर अनेक प्रशासकीय कामांत त्यांचा थेट हस्तक्षेप होता. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे मन साफ नव्हते व मंत्र्यांना राजभवनावर बोलवून ते सल्ले व सूचना देत होते. महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, विद्यापीठांचा कारभार याबाबत ते कमालीचे जागरूक होते. शिवाजी महाराजांपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत वादग्रस्त विधान करून ते खळबळ माजवीत होते. ते आपले कार्यक्षम राज्यपाल आज कोठे आहेत? त्यांचे ज्ञान, अनुभव यांचे मार्गदर्शन शिंदे, फडणवीसांच्या सरकारला होऊ नये याचे आश्चर्यच वाटते. असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?? 3 Vs 3 मुकाबला होण्याची शक्यता
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/AzrNW8VhSM#hellomaharashtra @ShivSena @INCIndia @NCPspeaks @mnsadhikrut @BJP4Maharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 23, 2022
सत्य असे आहे की, राजभवनाने आता लुडबुड करू नये, निवृत्तीबुवांसारखे राहावे हा राजकीय आदेश राज्यपाल महोदय पाळीत आहेत. राज्यपालांकडे खरोखरच काही काम उरले नसेल तर मुंबईतील भाजप नेत्यांच्या डॉक्टरेट पदव्याच्या चौकशीचे आदेश तरी त्यांनी द्यावेत. एकंदरीत राज्यपाल या दिवाळीत कोणतेही लवंगी फटाके फोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. महाराष्ट्राचा शेतकरी महाप्रलयात गटांगळ्या खातो आहे. त्याची पिके वाहून गेली. त्याला सरकारी मदत मिळालेली नाही.मात्र राज्यपालांनी शेतकरयांच्या या आक्रोशाची दखल घेतलेली नाही. अर्थात, राज्यपालांनी अशी दखल घ्यायला राज्यात सध्या काय ठाकऱ्यांचे सरकार सत्तेवर आहे? असा खोचक टोला सामनातून भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.