हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडेंची (Sambhaji Bhide) जीभ पुन्हा घसरली आहे. अमरावतीच्या एका कार्यक्रमात भिडे यांनी थेट महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संभाजी भिडे आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्याविरोधात राज्यांतील काही गांधीवादी संघटनांनी आंदोलन देखील पुकारले आहे.
मंगळवारी अमरावतीच्या बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी, “महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत” असे वक्तव्य केले. इतकेच नव्हे तर त्यांनी, गांधीजींच्या जन्मापासूनचा मागील इतिहास देखील सांगितला. मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”
भिडे पुढे म्हणाले, देशामध्ये सर्वधर्म समभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली” असे आवाहन त्यांनी आपल्या सभेमध्ये केले.
दरम्यान संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. यापूर्वी देखील संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मात्र आता त्यांनी थेट महात्मा गांधी यांच्याविषयी खळबळजनक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.