हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या खासदार पदाचा कार्यकाळ संपत आहे. कार्यकाळ संपत आल्यानंतर संभाजीराजे नक्की काय भूमिका घेणार? नवीन पक्ष स्थापन करणार कि कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात खुद्द संभाजीराजे यांनी मोठे विधान केले आहे.
संभाजीराजे यांनी आज कोल्हापुरात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या खासदारकी 3 मे रोजी संपत असून याबाबत काय भूमिका घेणार याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी आपली राजकीय भूमिका ही 3 मे नंतरच स्पष्ट करणार असे सांगितले.
यावेळी संभाजीराजे म्हणाले की, “येत्या 3 मे रोजी माझ्या खासदारकी पदाचा कार्यकाळ संपतो आहे. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे गेली सहा वर्षे मी काेणाचा ही प्रचार केलेला नाही. येत्या तीन मे राेजी माझा कार्यकाल संपत आहे. सरकारनं जे काही आश्वासन दिले हाेते. ते सर्वच पुर्ण झाले नाही हे मी मान्य करताे. त्याचा पाठपूरावा सुरु आहे. सरकारने शब्द दिला आहे काही गाेष्टींची पुर्तता करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे.
मी माझी भुमिका पार पाडली आहे. सरकार आणि विराेधी पक्ष यांनी ठरवावे काय मार्गी लावायचे आणि काय नाही. मात्र, 3 मे नंतर मी माझी राजकीय दिशा स्पष्ट करेन, ती नक्कीच वेगळी असेन असे सांगितले. खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर राजे भाजपत प्रवेश करणार, सेना-राष्ट्रवादीकडे जाणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार? याची चर्चा सध्या केली जात आहे.