सातारा प्रतिनिधी | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ खातेवाटपाची यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये अनेक नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. देसाई यांना राज्यमंत्री पद दिल्याने पाटण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. शंभुराज शिवाजीराव देसाई यांना
गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन आदी खाती देण्यात आली आहेत.
देसाई हे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. याबरोबरच ते उत्कृष्ट संसदपट्टू म्हणूनही ओळखले जातात. भाजपा-शिवसेना या युती सरकारच्या काळात देसाई यांचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असलेले मैत्रीपूर्ण सबंध हे सर्वश्रुत आहेत.
युती सरकारच्या काळात भाजपा शिवसेना मधील सबंध ताणले गेल्यावर या दोन्ही राजकीय पक्षाशी संवाद साधून त्यांच्यातील विसंवाद दूर करण्याची जबाबदारी देसाई यांच्यावर होती. या संबंधाच्या जोरावर त्यांनी आपल्या पाटण मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणला आहे.
कॉंग्रेस पक्षाचे जुने जाणते करारी नेते माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शंभुराज हे नातू असून बाळासाहेब देसाई यांनी यापूर्वी महसूल , शिक्षण, गृह, कृषी खाते सांभाळून त्यांना लौकिक प्राप्त करून दिला होता. करारी आजोबाचा करारी नातू अशी ओळख शंभुराज यांची आहे.