हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील 75 हजार कोटी रुपयांच्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण होत आहे. यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रो टप्पा 2 या प्रकल्पाचा समावेश आहे. राज्याच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची काही खास वैशिष्ट्ये आहेत.
मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर हा महामार्ग आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे. समृद्धी महामार्गाचे वैशिष्ठ म्हणजे हा महामार्ग रात्री उजळून निघतो आणि तोही सौरऊर्जेने. 701 किलो मीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग असून समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास हा 17 तासांवरून हे अंतर 7 तासांवर येणार आहे.
या महामार्गाची अनेक अशी वैशिष्ट्ये आहेत. या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी 11 लाख वृक्ष असणार आहे. तर राज्यातील एकूण 36 टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी 55 हजार 355 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा, समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी सुमारे 9 हजार 900 हेक्टर जमीन संपादित केली आहे. 10 हजार हेक्टर जमीन कृषी समृद्धी नगर विकसित करण्यासाठी आणि 145 हेक्टर जमीन समृद्धी महामार्गाजवळील सुविधा आणि सुविधांसाठी वापरली जाईल.
नरेंद्र मोदी यांनी जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय वन हेल्थ संस्था , नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेणारा समृद्धी महामार्ग #MahaSamruddhi pic.twitter.com/hje242Gy4s
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) December 11, 2022
या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर उर्जा सुविधांमधून 138.47 मे.वॅ. सौर उर्जा निर्माण होणार आहे. सर्वाधिक गतीने पूर्ण भूसंपादन या महामार्गावर झाले. 8800 हेक्टर जागा ही सर्वाधिक गतीने भूसंपादन करण्यात आली. अवघ्या 12 महिन्यात भूसंपादन करण्यात आली. यासाठी 8003.03 कोटी रुपये भूसंपादनापोटी राज्य सरकारने दिले.
असा असणार टोल…
समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रति कि.मी. 1 रुपये 73 पैसे या दराने टोल आकारला जाणार आहे. त्यामुळे औरंगाबाद ते शिर्डी हे अंतर 99 कि.मी. असून, शिर्डीला जाण्यासाठी 171 रुपये टोल द्यावा लागणार आहे. तसेच नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी 900 रुपये आणि औरंगाबाद ते नागपूर या प्रवासासाठी 700 रुपयांपेक्षा जास्त टोल भरावा लागणार आहे.
12 जिल्ह्यातून जाणार समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्ग नागपुर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. हे जिल्हे पुढिल प्रमाणे – नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई! तसेच पाच महसुल विभाग येतात. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बिड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतूकीचा फायदा होणार आहे. जवळपास 26 तालुके व 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. विदर्भातून 400 किमी, मराठवाड्यातुन 160 किमी व उर्वरित महाराष्ट्रातून 140 किमी असा समस्त महाराष्ट्राला हा महामार्ग दिशादर्शक ठरणार आहे.
7 राष्ट्रीय महामार्ग जोडले जाणार
समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH 3, NH 6, NH 7, NH 69, NH 204, NH 211, NH 50 यांचा समावेश होतो. महामार्गाची एकुण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अश्या आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका हि 22.5 मिटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनूसार आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करावयाची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष. महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने आदी उभारण्यात येणार आहे.