Samruddhi Mahamarg : 100 दिवसांत 900 अपघात; समृद्धी महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग

Samruddhi Mahamarg
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तत्कालीन फडणवीस सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) उदघाटन झाल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे 100 दिवसात तब्बल 900 अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 20 मार्च 2023 पर्यंत या अपघातांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अजूनही सुरूच आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी या द्रुतगती(Samruddhi Mahamarg) महामार्गाचे उद्घाटन केले होते. राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी तसेच दळणवळण सोप्प होण्यासाठी हा ऐतिहासिक महामार्ग तयार करण्यात आलाय. मात्र सततच्या अपघातांमुळे हा मार्ग मृत्यूमार्ग बनला आहे. समृद्धी महामार्गावर वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अपघाताचे हे प्रमाण रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर, मंगळवारी राज्य परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहण्याच्या एक दिवस आधीच उप परिवहन आयुक्त भरत काळसकर यांनी एक्स्प्रेस वेची (Samruddhi Mahamarg) पाहणी करण्यासाठी सुमारे 500 किमी प्रवास केला होता. या बैठकीत एक्स्प्रेस वेच्या आठही एंट्री पॉईंटवर चालकांचे अनिवार्य काउंसलिंग आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. खास करून ओव्हरस्पीडिंगला आळा घालण्यासाठी या काउंसलिंग मध्ये विशेष लक्ष दिले जाईल. नागपूर ते शिर्डी विभागात एकूण 8 काउंसलिंग केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

येत्या 7 दिवसात प्रत्येक जिल्ह्यात 1 काउंसलिंग सेंटर उभारण्यात येईल. ओव्हरस्पीडिंगला आळा घालण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांकडून चालकांसाठी 30 मिनिटे ते 1 तासाचे काउंसलिंग सेशन घेण्यात येईल. याची सुरुवात रस्ता सुरक्षेवरील लघुपटाने होईल. त्यानंतर ड्रायव्हरद्वारे प्रश्नपत्रिका सोडवल्या जातील आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये अशी प्रतिज्ञा दिली जाईल.

अधिकाऱ्यांच्या या बैठकीत रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणारे फलक लावण्याच्या सूचनाही एमएसआरडीसीला देण्यात आल्या. 11 डिसेंबर 2022 ते 20 मार्च 2023 या 100 दिवसातील समृद्धी एक्स्प्रेस वेच्या (Samruddhi Mahamarg) अपघाताच्या आकडेवारीची छाननी केली असता गाडीचे स्पीड जास्त असल्याने जवळपास 400 हुन अपघात झाल्याचे निदर्शनास आले. टायर पंक्चर झाल्याने 130 आणि टायर फुटल्याने 108 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. अपघाताची इतर कारणे बघितली तर पाठीमागून गाडीने धडक देणे, वाहनचालकांना झोप लागणे, तांत्रिक बिघाड किंवा वाहनासमोर अचानक जनावरे येणे ही कारणेही समोर येत आहेत.