हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यापासून दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा याच समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) गुरुवारी पहाटे 5 वाजता भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी चालकाला झोप लागल्यामुळे बाजूला असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे. ही अपघाताची घटना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.
तीन जणांचा जागीच मृत्यू (Samruddhi Mahamarg Accident)
समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे अहमदनगरहून रायपूरकडे खासगी टेम्पो ट्रॅव्हलर निघाला होता. याचवेळी गाडी चालवताना चालकाला डुलका लागला. त्यामुळे ट्रॅव्हलर थेट जाऊन कंटेनरला धडकली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच 3 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर काहीजण जखमी झाले. आज पहाटे ही घटना अमरावती जिल्ह्याच्या वाढोना शिवणीदरम्यान असलेल्या चॅनल 128 वर घडली. ज्यामुळे काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मुख्य म्हणजे, हा अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी ताबडतोब पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले होते. यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद करत गाडीत अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या सर्व घटनेनंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे सध्या पोलीस या चालकाचा शोध घेत आहेत. तसेच त्यांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) पुन्हा एकदा अपघात घडल्यामुळे या मार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे.