हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) फोटो किंवा रील्स काढणाऱ्या व्यक्तीला इथून पुढे 500 रुपयांचा दंड आणि एक महिन्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढणाऱ्या व्यक्तींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या मार्गावर असे कृत्य करणे प्रवाश्यांना महागात पडणार आहे. यापूर्वी समृद्धी महामार्गावर फोटो आणि रील्स काढणाऱ्या व्यक्तींना खडसावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. मात्र तरी देखील याठिकाणी रील्स काढण्यासाठी लोक गाडी थांबवता. त्यामुळेच अशा व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत.
सतत होणाऱ्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न –
समृद्धी महामार्ग त्याचे उद्घाटन झाल्यापासून चर्चेत राहिला आहे. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणामध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच या महामार्गावर तरुण मंडळी तसेच प्रवासी फोटो, रील्स काढण्यासाठी थांबलेले आढळून आले आहेत. गाड्या थांबल्यामुळे वाहतुक तोंडाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर असे प्रकार थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. इथून पुढे जर समृद्धी महामार्गावर कोणी फोटो किंवा रील्स काढण्यासाठी थांबलेले दिसले तर त्यांच्यावर कारवाई होईल.
काय आहे शिक्षा ? (Samruddhi Mahamarg)
समृद्धी महामार्गावर फोटो किंवा रील्स काढणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपयांचा दंड आणि एक महिन्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस सर्व प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच महामार्गावरील पुलावर चढून एक तरूण मुलगा फोटो काढताना सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी अशा बाबी टाळण्यासाठी ही मोठी पावले उचलली आहेत. वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तरुणांचे महामार्गावर गाड्या थांबून फोटो किंवा रील्स काढण्याचे प्रमाण कमी होईल.
दरम्यान, मुंबई ते नागपूरला जाणारा 701 किमीचा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) MSRDC कडून बांधण्यात आला आहे. हा मार्ग बांधण्यासाठी सरकारकडून हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा मार्ग खुला होऊन सहा महिने झाले असतानाच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्गावर खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या बाजूला, समृद्धी महामार्गावरून विरोधात टीका करताना दिसत आहेत. या महामार्गाच्या कामावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.