सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मुंबई येथे ट्रकचालक म्हणून काम करणारा एकजण ट्रकमधून इस्लामपूरमध्ये आला होता. त्यानंतर टँकरमधून कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील त्याच्या गावी जात असताना मुंबई येथून आल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. आरोग्य तपासणीमध्ये तो संशयित वाटल्याने ताबडतोब त्याला मिरजेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांगलीची अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता आठवर पोहोचली आहे.
कर्नाळ येथील कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या बेडग व बुधगाव येथील नऊजणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर निगडी येथील बाराजणांचे दुसरे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. मुंबई येथून आल्याने सदर व्यक्तीची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. यावेळी या व्यक्तीची लक्षणे कोरोना संशयित वाटल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी पाठविले. या ठिकाणी असणाऱ्या डॉ. सतीश कोळेकर यांनी त्या व्यक्तीला कवठेमंकाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ डी आर पाटील यांच्याकडे संदर्भित केले.
दरम्यान, त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेची संपर्क केला असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे सदर व्यक्तीला मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले. काल या व्यक्तीचा स्वाब घेण्यात आला होता. आज त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून सदर व्यक्ती कोरोणा बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे. या व्यक्तीला त्याच्या गावाकडे जाऊ न देता रस्त्यातच त्याची तपासणी केल्याने पुढील अनर्थ टळला. आरोग्य यंत्रणेने केलेल्या तत्पर हालचालींबद्दल जिल्हाधिकारी डॉ .अभिजीत चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.