सांगली | सांगलीवाडीतील बायपास रस्त्याच्या परिसरात शनिवारी रात्री महाकाय गव्याचे दर्शन झाले. कदमवाडीच्या दिशेने आलेला गवा कदमवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडून नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतात गेल्याने एकच खळबळ उडाली. महाकाय गव्याच्या दर्शाने सांगलीकरांची तारांबळ उडाली. शनिवार रात्री उशिरापर्यंत वन विभाग, पोलिस आणि अग्निशमन दलाकडून गव्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होता.
सांगलीवाडीतून कदमवाडीकडे जाणार्या रस्त्यावर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास गवा दिसला. बायपास रस्त्यालगत नवीन पुलाशेजारी असलेल्या उसाच्या शेतात गवा गेल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. गवा आल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल, वनविभाग आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
रात्री उशिरा पर्यंत गव्याचा शोध सुरू होता. परंतु, उसात गेलेला गवा रात्री उशिरापर्यंत बाहेर न आल्याने त्याला पाहण्यासाठी, तसेच तो सांगली शहरात प्रवेश करू नये यासाठी नागरिकांसह यंत्रणेची मोठी गर्दी झाली होती.
काही महिन्यांपुर्वी कसबे डिग्रजच्या शेतमळ्यात गवा आला होता. त्या पूर्वी सांगलीतील विश्रामबागमध्ये रात्रीच्यावेळी गवा आला होता. गर्व्हमेंट कॉलनीतील रस्त्यावर अचानक महाकाय गवा दिसताच अनेकांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर शनिवारी रात्री सांगलीवाडी परिसरात गवा दिसला आहे. यामुळे सांगली परिसरात खळबळ उडाली आहे.