होय… मी शिवसेनेचाच मावळा, उद्धवजींचा विश्वास सार्थ करून दाखवणार; संजय पवारांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “होय.. मी शिवसेनेचा मावळा आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. जो मावळा आदरणीय बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देव मानतो त्याच्याबाबतीत आज जो निर्णय घेतला गेलेला आहे त्याचा मला आनंद होत आहे, मी मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणार असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्याची घोषणा केल्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मला सर्व तयारी करावी लागणार आहे. मला एका गोष्टीचा आनंद होत आहे जो शिवसैनिक ३० वर्षांपासून कोल्हापूरसारख्या सहकार क्षेत्र लाभलेल्या ठिकाणी काम करतोय. मातोश्रीला मंदिर मानतो. जो १४ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतो त्याला उमेदवारी देणे हे कोणत्या पक्षात घडत. हे फक्त शिवसेनेतच घडते. म्हणून माझा शिवसेनेला सलाम आहे.

माझ्या उमेदवारीबाबत अजून तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी चरचा केलेली नाही. फक्त अनिल देसाई यांनी माझी भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे हे आमचे बोस ते जे काही निर्णय घेतील तो आम्ही शिवसैनिक म्हणून मान्य करू, असेही यावेळी संजय पवार यांनी सांगितले.

मी संजय राऊतांसोबत अर्ज दाखल करायला जाणार

राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना नेते संजय राऊत हे 26 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत आपणही राज्यसभेत अर्ज दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती संजय पवार यांनी यावेळी दिली आहे.