हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी भाजपची आहे, पण भाजप थोडीच माझं आहे असं म्हणत माजी मंत्री पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी खळबळ उडवून दिली होती. पंकजा यांच्या या विधानाने त्या भाजप मध्ये नाराज असल्याच्या चर्चाना पुन्हा एकदा ऊत आला. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंकजा मुंडे यांना खास सल्ला दिला आहे. माझ्यावर अन्याय झाला या रडगाण्याला कोणी विचारत नाही, त्यापेक्षा राजकारणातून सन्यास घ्या असा सल्ला संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा झाला हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्षासाठी रक्ताचे पाणी केले. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर अशा अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात शून्यातून भाजप निर्माण केला. त्या मुंडे परिवाराचे राजकीय अस्तिस्त्व राहू नये यासाठी दिल्ली व महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत. असा आरोप राऊतांनी केला.
मुंडे परिवाराबद्दल आमच्या मनात कायम आस्था आहे. गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाहीत त्यामुळे त्यांच्या परिवाराची राजकीय वाताहत करण्यात येत आहे. अशावेळी परिवारातील प्रमुख नेत्यांनी साहसाने निर्णय घेण्याची गरज आहे. परिणामाची पर्वा न करता निर्णय घेण्याची गरज असते तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता, नाहीतर तुम्ही राजकारणातून सन्यास घ्यायला पाहिजे. आमच्यावरती अन्याय होतोय या रडगाण्याला कोणी विचारत नाही असा सल्ला संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना दिला.