हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजापुरचे पत्रकार शशीकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शशीकांत वारिसे यांची हत्याच करण्यात आली असून या हत्येचा मास्टरमाईंड कोण आहे हे गृहमंत्री फडणवीसांना माहित आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फडणवीस यांच्या कोकणातील रिफायनरीबद्दलच्या भाषणानंतरच पत्रकार मारला जातो याचा संबध काय लावायचा असा सवालही राऊतांनी केला.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, कोकणात रिफायनरी आल्यामुळे कोकणाचं कस नुकसान होईल, शेतीचे नुकसान होईल याबद्दल शशीकांत वारिसे आवाज उठवत होते. तसेच कोकणात रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी कवडीमोल किमतीत जमिनी घेतल्या, ते जमीनदार कोण आहेत यासंदर्भात त्यांनी माहिती देण्यास सुरुवात केली. रिफायनरी समर्थक सरकारमधील काही लोक आणि रत्नागिरी येथील काही राजकारणी यांचं जमिनीबाबत काय साटंलोटं आहे त्यासंदर्भात शशिकांत वारसे यांनी लिहायला आणि बोलायला सुरुवात केली होती त्यामुळे ते काही राजकारण्यांच्या डोळ्यात खुपत होते.
कोकणातील आंगणेवाडीच्या जत्रेत महाराष्टचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या आणि काही झालं तरी रिफायनरी करून दाखवणार, कोण आडवं येतेय पाहू अशा प्रकारची भाषा केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारीसे यांची हत्या झाली हि गंभीर गोष्ट आहे. म्हणजे २४ तास आधी फडणवीस म्हणतात, रिफायनरीला कोण आडवा येतोय पाहू आणि दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा पत्रकार मारला जातो याचे काय संबंध लावायचे असा थेट सवाल संजय राऊतांनी केला.
महाराष्ट्रात कालपर्यंत आपल्या विरोधात आवाज उठवतील त्यांना ईडी, सीबीआय च्या माध्यमातून तुरुंगात टाकलं जात होते, आता सरकार आणखी पुढे गेलं आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांची हत्या होऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र्रात ही गुंडशाही आणि झुंडशाही सुरु झाली आहे. कोकणात पुन्हा एकदा हत्येचं सत्र सूर झालं आहे. कोकणातील यापूर्वीच्या हत्या, हल्ले यामागील खरे सूत्रधार कोण आहेत हे फडणवीसांना माहित आहे असेही संजय राऊतांनी म्हंटल.