हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये “शाब्दिक वॉर” सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, गुरुवारी उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. आता त्यांनी केलेल्या या दाव्याला नेते संजय राऊतांकडून (Sanjay Raut) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी, “पुढील दोन महिन्यानंतर सत्ता आल्यानंतर नारायण राणे हे तुरुंगात असतील” असे म्हणले आहे. यातूनच संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे सरकार स्थापित होईल, असा अप्रत्यक्षपणे विश्वास व्यक्त केला आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या दाव्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना,” पुढील 2 महिन्यानंतर सत्ता आल्यावर नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील. नारायण राणे यांच्या ईडी/सीबीआयच्या बंद फाईल आमची सत्ता आल्यावर उघडणार आहे” असे संजय राऊत यांनी म्हटले.
त्याचबरोबर, “विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आमचेच आहेत. त्यांची नाराजी लवकरच दूर करण्यात येईल. सांगलीची जागा शिवसेनाच लढणार आहे. विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्याविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील संसदेत कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार आहे” असे देखील संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीत जागावाटपावेळी सांगलीतील जागेवर काँग्रेसने दावा केला होता. मात्र तरी देखील ठाकरे गटाकडून सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या चंद्रहार पाटील यांच्याच प्रचारासाठी संजय राऊत देखील सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. याचवेळी त्यांनी पुढील दोन महिन्यानंतर बाप-बेटे तुरुंगात जातील, अशी टीका नारायण राणे यांच्यावर केली आहे.