हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही देऊ शकतात” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका, असा सल्ला राऊतांनी गडकरींना दिली होता.
“संजय राऊत यांचं कसं आहे, की अमेरिका, इंग्लंड, बेळगांव हे त्यांना माहिती असतं. आम्ही सामान्य माणसं आहोत. संजय राऊत ते कोणालाही सल्ला देऊ शकतात. अमेरिकेच्या, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात, तर ते गडकरींनाही देऊ शकतात” असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला. बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, या संजय राऊत यांच्या आवाहनानंतर भाजप नेते नितीन गडकरी यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी गडकरींचा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याऐवजी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी बेळगावात भाजपच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती समोर आहे.
आम्ही आणि त्यांनीही अहंकार कधी दाखवू नये. कालचक्र नेहमी फिरत असतं. पंधरा वर्ष त्यांचं सरकार होतं, मग आमचं आलं, पुन्हा त्यांचं आलं, पुन्हा आमचं गेलं, त्यांचं आलं, त्यांना नीट माहिती आहे की सरकार केव्हा जाणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्याकरता अशी धडपड त्यांना करावी लागते. आम्ही मात्र सातत्याने सरकारच्या विरोधात संघर्ष करतोय. काल दिलेलं पॅकेजही आम्ही वर्षभर पाठी लागल्यावर फुटकं तुटकं दिलेलं आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.