हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची सातत्याने होत असलेल्या ईडी चौकशीला आता सरकार कडून देखील त्याच पद्धतीने सडेतोड उत्तर देण्यात येत असल्याच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीत 100 कोटींची अफरातफर झाली असून या प्रकरणाची सुद्धा ईडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
भाजपचे उपरे पुढारी प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोटयवधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. त्यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीने सरकारी पैशाचा केलेला अपहार 100 कोटींच्या वर आहे. ईडी’ने तत्काळ त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद करावा व अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणे या कंपनीच्या मालकांनाही समन्स पाठवावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
‘ईडी’ने याप्रकरणी डोळे मिटून दूध पिण्याचे ठरवले असेल तर राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाने तत्काळ कारवाई करावी. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करणारया विरोधी पक्षाच्या या उद्योगांचाही भंडाफोड़ होणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष कोणत्या मुद्द्यांवर व गुद्दयांवर सरकारची कोंडी करणार आहे? जरूर करा, पण त्याआधी तुमच्या पार्श्वभागाखाली कोणत्या मुद्दयांना मोड फुटलेत तेही पाहा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.