हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. यावरून शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी टीका केली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत आज पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला. ‘पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे आणि लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही किंवा कायदा नाही. केसरकर खरचं असं बोलले असतील तर त्यांनी देखील 2024 मध्ये कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा राऊतांनी दिला.
संजय राऊत यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे जे काही संघटन आहे ते आपल्यासोबत आले तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल. आंबेडकरांनी केलेले वक्तव्य सकारात्मक आहे.
शिवशक्ती-भिमशक्ती यांनी एकत्र यावे अशी आमची खूप इच्छा होती. देशातील आणि महाराष्ट्रातील सत्ता उलथवायची असेल तर या दोन शक्ती एकत्र येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकरांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत, असे राऊत यांनी म्हंटले.