हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले असून त्यासंदर्भात लवकरच मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. तसेच तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत. त्या महाराष्ट्रातही आहेत, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनिल सिंडिकेट चालवत आहेत याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवणं हे संसदेचा सदस्य आणि शिवसैनिक म्हणून देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यानुसार मी माहिती दिली आहे. अशी माहिती मी वारंवार देत जाईल. यानंतर मुंबईत येऊन याबाबत पत्रकार परिषद घेईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडून कारवाईची अपेक्षा नाही. कारण केंद्रातल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशांनुसार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या सूडाच्या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्रात जास्त. जणूकाही केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच काम आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचं. खोटी प्रकरणं, खोटे पुरावे उभे करायचे. अशी चिखलफेक सुरू आहे. पण जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हात देखील किती बरबटलेले आहेत हेसुद्धा देशाला कळायला हवं”, असं राऊत म्हणाले