मी पळपुटा नाही, ED च्या चौकशीला सामोरे जातोय; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी दोन दिवस अगोदरच शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीच्यावतीने समन्स बजावण्यात आले. ईडीच्या नोटीसीनंतर आज ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. तत्पूर्वी त्यांनी मी कधीही चुकीचं काम केले नाही,  कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि मी पळपुटाही नाही. तरीही मी आज चौकशीला सामोरे जात आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांना दोन दिवसांपूर्वी कथित पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी ईडीने समन्स पाठवले होते. त्यानंतर राऊत आज ईडी चौकशीसाठी आज हजार झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझी ईडीवर पूर्णपणे विश्वास आहे. मी कोणत्याही प्रकारचा घोटाळा केलेला नाही. तरीही बेडर होऊन मी आज चौकशीसाठी ईडीच्या समोर जात आहे.

दरम्यान राऊत यांनी आज सकाळी सकाळी ट्विट करत ईडीच्या चौकशीसाठी आज हजर राहणार असल्याचे म्हंटले होते. ” मी आज दुपारी 12 वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे.” त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहनही केले आहे की, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयात जमू नये, असे आवाहन राऊतांनी केले होते. त्यानंतर राऊत आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. ही चाळ विकसित करण्याचे काम प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. परंतु त्यांनी या चाळीचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. प्रवीण राऊत यांच्या कंपनीला पत्रा चाळीतील 3 हजार फ्लॅटचे काम देण्यात आले होते. त्यापैकी 672 फ्लॅट भाडेकरांसाठी राखीव ठेवण्यात आले होते तर बाकीचे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. मात्र, 2011 ते 2013 सालांमध्ये प्रवीण राऊत यांनी चाळीचे अनेक भाग खासगी बिल्डर्सना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार राऊतांना ईडीच्या वतीने नोटीस पाठवत हजर राहण्यास सांगितले आहे.

Leave a Comment