हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्याकडून जम्मू काश्मीरचा दौरा केला जात आहे. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असून यापूर्वी त्यांनी एक मोठे विधान केले. शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा राऊतांनी केली आहे.
जम्मूत खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसशिवाय कोणत्याही विरोधी पक्षाची आघाडी होऊ शकत नाही. एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व तळपताना दिसत आहे. लोक राहूल गांधी यांना आता स्वीकारत आहेत.
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते. मशाली काय काँग्रेसचे चिन्हं नाही. ते शिवसेनेचे चिन्हं आहे. पाहिल्यानंतर मलाही भरून आले. देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते, असेही राऊत यांनी म्हंटले.
मोदींना पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणने जमले नाही : राऊत
शिंदे गटाच्या नेत्यांनी राऊत यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. त्याचाही राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. “जम्मूवरही पाकिस्तानचे तोफगोळे पडत असतात. अतिरेक्यांचे हल्ले होत असतात. इकडे या म्हणजे कळेल. तिकडे बसून बोलणे ठिक आहे. पाकिस्तानात जाऊ ना. मोदी यांनी त्याच विषयावर मत मागितली आहेत. मोदींना पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणने जमले नाही आणि आमच्या हातात सत्ता आली की पाकिस्तानात जाऊ शकतो, असे राऊत यांनी यावेळी म्हंटले.