हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतीच ‘आवाज कोणाचा’ पोडकास्टसाठी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत संजय राऊत बेधडकपणे सरकारवर टीका करताना आणि आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. तसेच मुलाखतीत बोलताना “शिवसेना ही उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) नसून ती बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) आहे” असे वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केले आहे. आवाज कोणाचा मुलाखतीत राऊतांनी त्यांच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नात्याविषयी भाष्य केले आहे.
या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “आतापर्यंत मी सर्वात जास्त बाळासाहेबांच्या सहवासा मध्ये राहिलो आहे. मला बाळासाहेबांचा सहवास सर्वाधिक लाभला आहे. त्यांचं आणि माझं खूप जवळचं नातं होत. जेव्हा मी सामनामध्ये आलो तेव्हा मला अग्रलेख लिहिता येत नव्हता. मात्र, मी लिखाणाबाबत कधीच माघार घेतली नाही. या विषयांवर बाळासाहेबांसोबत नेहमी चर्चा व्हायची. ते नेहमी अग्रलेख वाचायचे तसेच “बाळासाहेबांना एखादा अग्रलेख आवडला तर ते शाब्बासकी द्यायचे आणि काही चुकलं तर वडिलांप्रमाणे रागवायचे. पण मात्र जाहीर सभांमधून त्यांनी अनेकदा कौतुकही केलं आहे. प्रमुख आणि वरिष्ठ लोकांशी ते माझी सहसंपादक म्हणून ओळख करून द्यायचे. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. यामध्ये प्रामुख्याने मी त्यांच्याकडून बेडरपणा शिकलो आहे” असे राऊत यांनी म्हणले आहे.
पुढे बोलताना, पूर्वी मराठी माणसाला लोक घाटी कोकणी म्हणत होते, भिकारी म्हणत होते. तेव्हा मराठी माणसाला कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा नव्हती. बाळासाहेबांनी 50 वर्ष अथक प्रयत्न आणि कष्टानं मराठी माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली असल्याचे राऊतांनी सांगितले आहे. इतकेच नव्हे तर, “उद्धव ठाकरे म्हणतात शिवसेना माझी आहे. मात्र ही शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही तर ही शिवसेना बाळासाहेबांची आहे. आम्ही सगळे बाळासाहेबांचे विचार घेऊन या प्रवाहात आलो आहोत” असेही वक्तव्य त्यांनी मुलाखतीत केले आहे.
त्याचबरोबर, “माझा नेहमी लेखणीवर खूप विश्वास आहे. लेखणीनं क्रांती घडू शकते, असं माझं ठाम मत आहे. कारण जगामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती घडली तेव्हा तेव्हा वृत्तपत्र काढलं गेलं आहे. देशामध्ये स्वातंत्र्याचा संदेश तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी सुरू केला होता. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक माध्यम निर्माण झाली असली तरी माझा कागद आणि पेन यावरच विश्वास आहे. कारण क्रांती फक्त यामधूनच घडू शकते” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.