हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास सुरुवात झाली. काल शिवसेनेने व्हीप बजावल्यानंतरही शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांनी त्याला झुगारत मतदान केले. त्यानंतर सभागृहात टोलेबाजीचे राजकारण रंगले. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार व भाजपवर निशाणा साधला आहे. “शिवसेना म्हणजे काय युक्रेन समजला काय? कि ती ताब्यात घ्यायला निघाला. ती युक्रेन नाही, असा कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही.”असे म्हणत राऊतांनी भाजप व शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी आजदिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “हे काय रामशास्त्रींचे राज्य नाही, ही राजकीय चढाओढ आहे. कालपासून विशेष अधिवेशनास सुरुवात झाली आहे. या विधीमंडळातील लढाया या चालूच राहतील. ज्याच्या हाती ससा तो पारधी अशी एक म्हण आहे आपल्याकडे, याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. विधीमंडळाच्या पीठासीन अधिकारी म्हणून ज्याला बसवलं जातं तो सत्ताधारी पक्षाचा माणूस असतो आणि तो त्यांच्या पद्धतीने निर्णय घेत असतो. मग राज्यसभा असो, लोकसभा असो किंवा मग विधानसभा असो.
जे काही बंडखोर आमदार शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. ते बंडखोर नेते खरंच शिवसेनेचे आमदार राहिले आहेत का? त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचाराव. काल शरद पवार यांनी जे मध्यावती निवडणुका महाराष्ट्रात होऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. त्यांच्या मताशी मीही सहमत आहे, असेही राऊत यांनी यावेळी म्हंटले.