हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून नाशिक जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिंदे गटावर व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. कुठल्याही गावात गेल्यास गद्दारांना खोकेवाले आले असे म्हंटले जात आहे. आता या गद्दारांना फक्त चपला मारायची बाकी आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचे काहीच भवितव्य वाटत नाही. जतमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे पाणी सोडले आहे त्या पाण्यातशिंदे- फडणवीस सरकारने जलसमाधी घ्यावी, अशी टीका राऊत यांनी केली.
नाशिक येथे संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जे आमदार शिवसेनेतून फुटून बाहेर जात आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्या त्यांच्या मतदार संघात खूप काही ऐकायला मिळत आहेत. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या. कर्नाटकच्या बोम्मई सरकारने तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलं आहे. त्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकारने आता उडी मारून जलसमाधी घ्यावी.
शिंदे गटामध्ये सध्या काय सुरु आहे, कुणाचे बिनसले आहे याची पक्की खबर आमच्याकडे आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल. मात्र, गद्दारांच्या कपाळावर आता गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या बायका-पोरांनाही याचा त्रास होईल. यांच्या पिढ्यांना ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नसल्याचे राऊत यांनी यावेळी म्हंटले.
40 नेते गेले तरी, पक्ष अजून जमिनीवर – राऊत
यावेळी संजय राऊत यांनी आमदारांच्या बाबतीत महत्वाचे विधान केले. “काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली असे होत नाही. 40 नेते गेले असले तरी, पक्ष जमिनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका असतील या निवडणुका भीतीपोटी टाळल्या जात आहेत,” अशी टीका राऊत यांनी केली.