… तर 2024 मध्ये देशात राजकीय परिवर्तन; सामनातून राहुल गांधींवर स्तुतीसुमने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. मावळत्या वर्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वास नवे तेज आणि वलय निर्माण करून दिले. राहुल गांधींचे नवे रूप 2023 मध्ये तसेच राहिले तर 2024 मध्ये देशात राजकीय परिवर्तन झालेले पाहता येईल असा आशावाद संजय राऊतांनी व्यक्त केला.

संजय राऊत नेमकं काय म्हणालेत-

कोणतेही वेगळेपण नसलेले 2022 हे वर्ष फार खळखळाट न करता मावळले आहे. मावळत्या 2022 सालाने महाराष्ट्राला व देशाला फसवणुकीशिवाय दुसरे काहीच दिले नाही. ही फसवणूक सत्ताधाऱ्यांकडून झाली, पण त्याच वेळी हाती सत्य आणि निर्भयतेची मशाल घेऊन श्री. राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रा’ घेऊन कन्याकुमारीतून निघाले. ते मावळत्या वर्षात दिल्लीत धडकले. सुमारे 2800 किलोमीटर प्रवास करून हा नेता दिल्लीत पोहोचला तेव्हाही त्याच्याबरोबर हजारो पदयात्री चालत होते व ही यात्रा बंद कशी पाडता येईल यासाठी पडद्यामागे दिल्लीतच कारस्थाने सुरू होती.

मावळत्या वर्षांनि राहुल गांधी यांच्या नेतृत्वास नवे तेज आणि वलय निर्माण करून दिले. कडाक्याच्या थंडीत फक्त एका टी शर्टवर राहुल गांधी चालत असतात. “राहुल गांधींना थंडी लागत नाही काय?” या प्रश्नावर या नेत्याने दिलेले उत्तर हृदयस्पर्शी आहे. हा प्रश्न ते मला विचारतात, पण हाच प्रश्न ते देशातील शेतकऱ्यांना का नाही विचारत? देशाच्या कष्टकरी, मजुराना, गरीब मुलांना का नाही विचारत? 2800 किलोमीटर चालतोय यात काय मोठे? संपूर्ण देश चालतोय, जीवनभर चालतोय. फॅक्टरीतला मजूर चालतोय, शेतकरी जीवनभर हजारो किलोमीटर चालतोय. त्यांना हे प्रेसवाले प्रश्न का विचारत नाहीत? राहुल गांधींचे नवे रूप 2023 मध्ये तसेच राहिले तर 2024 मध्ये देशात राजकीय परिवर्तन झालेले पाहता येईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.