हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूवरून शिवसेना खासदार यांनी सरकारवर निशाणा साधला होता, फडणवीस यांच्या कोकणातील भाषणानंतरच पत्रकाराची हत्या करण्यात आली याचा काय संबंध लावायचा असा सवाल त्यांनी केला होता. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारलं असता आपण संजय राऊतांची दखल घेत नाही असं राणे म्हणाले होते. त्यांनतर संजय राऊत यांनी राणेंना प्रतिउत्तर दिले आहे. नारायण राणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेते आहेत त्यामुळे ते आम्हाला लहान बोलत असतील अशी खिल्ली राऊतांनी उडवली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, नारायण राणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेते आहेत. ते इतके मोठे नेते आहेत की फ्रान्स, अमेरिका, लंडन येथील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ शकतात; त्यामुळे ते आम्हाला लहान बोलत असतील. पण, शिवसेनेने राणेंचा दोनवेळा पराभव केला. त्यांच्या पुत्राचाही पराभव शिवसेना खासदार विनायक राऊतांनी केला आहे. हे. नारायण राणेंची मानसिक अवस्था पाहता, त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नये. कारण आपण अशा मानसिक दृष्ट्या विकलांग लोकांकडे पाहू नये. आम्ही कोण आहोत, हे महाराष्ट्राला माहिती,” असं संजय राऊतांनी म्हटलं.
आम्ही डरपोक नाही, आमच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला म्हणून ३-४ वेळा पक्ष बदलणारे आम्ही नाही आहोत, आम्ही पळपुटे नाही, आम्ही आमच्या पक्षाबरोबर इमान राखून काम करतोय. आम्ही आमच्या पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडत राहू असेही राऊत म्हणाले. एका पत्रकाराच्या मृत्यूची चौकशी व्हावं असं मी म्हणल्यावर राणेंना वाईट वाटायचं काय काम असा सवालही त्यानी केला.